शिवसेनाभाजपच्या राजकीय धोरणांमुळेच महाराष्ट्रात युती लटकलेल्या अवस्थेत असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. युतीच्या अस्थिरतेची बीजे भाजपनेच २०१४ मध्ये रोवली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शनिवारी पुण्यात एका सभेमध्ये राज्यातील ४८ पैकी ४३ जागा भाजप जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या ’निर्धाराचा’ही त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ’ एकीकडे ४३ जागा जिंकण्याचा निर्धार करायचा तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेशी युती करण्याच्या गोष्टी करायच्या. एकदा नक्की काय ते ठरवा’ अशी ताकीदच या अग्रलेखात देण्यात आली आहे. तसेच राज्यातील समस्यांचा आढावा घेत भाजप सरकारच्या निष्क्रीयतेवर बोटे ठेवले आहे. सत्ता सगळ्यांना हवी असते पण सत्तेच्या नशेत राहणे योग्य नाही अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.